नागपूर,
Chandrashekhar Bawankule : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-महायुती विजयी होईल आणि अनेक ठिकाणी महायुतीचे महापौर असतील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल, असा ठाम दावा त्यांनी केला.
संग्रहित फोटो
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महसूल खात्यात राबविण्यात आलेल्या व्यापक सुधारणा, महायुतीची भूमिका तसेच विरोधकांवर टीका याबाबत सविस्तर माहिती दिली.
महानगरपालिका निवडणुकांबाबत भूमिका
नागपूर असो वा मुंबई, जिथे भाजप मजबूत आहे तिथे भाजप आणि जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे शिवसेना निवडणूक लढवेल, असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडसह इतर महानगरपालिकांमध्येही महायुतीतील चर्चा वेग घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवा स्वाभिमान पक्ष आणि महायुती
युवा स्वाभिमान पक्ष गेल्या १५ वर्षांपासून महायुतीचा भाग असून, अमरावतीतही महायुतीतूनच निवडणूक लढवली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
विरोधकांवर जोरदार टीका
आदित्य ठाकरे यांच्या प्रमोशनबाबत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी आपल्या मुलाला पुढे आणले होते, त्यामुळे यात नवीन काहीच नाही. तसेच संजय राऊत यांनी आयुष्यभर टीका करण्याचेच काम केले असून, त्यांना तेच दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या आरोपांवर ते म्हणाले की, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम निर्धार आहे.
महसूल खात्यात ऐतिहासिक निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खात्याची जबाबदारी दिल्यानंतर सात लाख कुटुंबांची घरे नियमित करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले आहेत. सनद आणि एनए (NA) प्रक्रियेतून नागरिकांची सुटका करण्यात आली असून, आता केवळ प्रीमियम भरल्यानंतर घर नियमित होणार आहे. या निर्णयाचा लाभ सर्व आरक्षण प्रवर्गांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रक्रिया
विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्रांसाठी स्टॅम्प पेपरची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेच्या आपसी वाटणीसाठी फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रक्रिया करता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘पांदण रस्ते योजना’ राबविण्यात येत असून, महसुली कायदे अधिक सोपे व लोकाभिमुख करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील दोन लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ
२०११ पूर्वी सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू असून, विदर्भातील दोन लाखांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळत असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.