सिंध,
Bus hijacked in Sindh पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील घोटाकी परिसरात अज्ञात बंदूकधार्यांनी दहशत माजवली असून बसमधून किमान १८ प्रवाशांचे अपहरण केले आहे. हे प्रवासी क्वेट्टाला जात होते. या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे. घटनेनुसार, सिंध-पंजाब सीमेजवळील हायवे लिंक रोडवर रात्रीच्या वेळी अज्ञात बंदूकधार्यांनी नियोजित हल्ला केला. त्यांनी बसवर गोळीबार केला आणि नंतर १८ जणांचे अपहरण केले. या गोळीबारात बस चालक आणि काही प्रवाशांना दुखापत झाली आहे.

बसमधील एका प्रवासी महिलेने सांगितले की, घटनास्थळी सुमारे २० हल्लेखोर उपस्थित होते, सर्व सशस्त्र आणि चेहरा झाकलेला होता. त्यांनी पुरुष प्रवाशांना बसमधून उतरवले, तर महिला प्रवाशांना इजा केली नाही. बंदूकधार्यांनी अनेक प्रवाशांना आपल्याबरोबर नेले. सिंधच्या गृहमंत्र्यांचे प्रवक्ते झिया उल हसन लांजर यांनी ही घटना दुःखद असल्याचे सांगितले. बसमध्ये चालक आणि वाहक यांच्यासह सुमारे ३० प्रवासी होते, आणि पोलिस सध्या तपास करत आहेत. पाकिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या दहशतीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये अशा घटनांची नोंद झाली आहे. या भागातील सुरक्षा दलांकडे वारंवार हल्ले केले जात आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.