चंद्रपूर,
chandrapur-super-thermal-power-station : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे सद्यस्थितीत 2 हजार ़920 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले केंद्र असून, या केंद्रात 500 मेगावॅटचे 5 संच व 210 मेगावॅटचे 2 संच कार्यान्वित आहेत. या वीज केंद्राने 12 डिसेंबरला एका दिवसात तब्बल 2 हजार 761 मेगावॅट वीज निर्मितीचा नवा विक्रम केला आहे.

महाराष्ट्राला नियमित आणि किफायतशीर दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान असून, हे केंद्र राज्याच्या ऊर्जेचा कणा मानला जातो. येथील संचांनी अनेकदा नवीन विक्रम गाठले आहेत. आता अधिक उत्कृष्टतेचा अध्याय रचत या केंद्राने वीज निर्मितीच्या क्षेत्रात अभूतपूर्व विक्रम साकारला आहे. 12 डिसेंबरला सायंकाळी 6 ते 7 या वेळात संच 3 ते 7 ने आतापर्यंतचे प्रति तास सर्वांत जास्त म्हणजे, 1 हजार 776 मेगावॅट (92.5 टक्के पीएलएफ) एवढी वीज निर्माण केली आहे. तर संच क्रमांक 1 व 2 ‘डिकमिशनिंग’ केल्यापासून आणि संच क्रमांक 8 व 9 कार्यात आल्यापासून सर्व संच मिळून आजपर्यंतचे प्रति तास सर्वांत जास्त म्हणजे एकूण 2 हजार 704 मेगावॅट (92.6 टक्के पीएलएफ) इतके वीज उत्पादन केले आहे.
संच क्रमांक 5 ने 12 डिसेंबरला आतापर्यंतचा सर्वाधिक एमईआरसी उपलब्धता 98.02 टक्के (दिवसाच्या आधारावर), टप्पा क्रमांक 3 ने सर्वाधिक एमईआरसी उपलब्धता 96.53 टक्के (दिवसाच्या आधारावर) व ‘टेरिफ-1’ ने सर्वाधिक एमईआरसी उपलब्धता 96.84 टक्क्यांचा उच्चांक गाठला. सातत्यपूर्ण अखंडित वीज निर्मितीचे अनेक विक्रम चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील अनेक संचांनी यापूर्वी केलेले आहेत. परंतु, सर्व संचांनी मिळून 2 हजार 700 मेगावॅटच्या वर वीज निर्मिती करण्याचा उच्चांक पहिल्यांदाच झाला आहे व पुढील कामगिरीसाठी एक नविन लक्ष्य ठेवले गेले आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी, यासाठी सर्वांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या चमुच्या मेहनतीमुळे व कार्याप्रती समर्पणामुळे तसेच सुयोग्य इंधन व्यवस्थापन, वेळेवर देखभाल आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतींचे अवलंबन याचे हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.