आयपीएल लिलावापेक्षा लक्ष वेधणारी मल्लिका सागर!

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
अबुधाबी,
Eye-catching Mallika Sagar टाटा आयपीएल 2026 चा बहुप्रतिक्षित मिनी लिलाव आज अबू धाबी येथे सुरु झाला. मात्र या संपूर्ण प्रक्रियेतील लक्षवेधक व्यक्ति फक्त खेळाडू नाही, तर लिलावाची सूत्रधार मल्लिका सागर आहे. गेल्या काही वर्षांपासून मल्लिका सागर आयपीएल लिलावाची ओळख बनली आहे. आयपीएल म्हंटल की तिचा चेहरा लगेच समोर येतो. मल्लिका सागर आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात लिलावाची जबाबदारी प्रामुख्याने रिचर्ड मॅडली सांभाळत होते. त्यानंतर ह्यू एडमिड्स आणि नंतर चारु शर्माने ही भूमिका निभावली.
 

mallika sagar 
मात्र 2024 पासून आयपीएल लिलावाची सूत्रे मल्लिका सागरच्या हाती आली आणि तिने या भूमिकेला पूर्णपणे नव्या उंचीवर नेले आहे. IPL 2026 च्या मिनी लिलावात कोट्यवधी रुपयांच्या बोली, संघांची रणनीती आणि खेळाडूंवरील दबाव याचे संतुलन राखण्याची जबाबदारी तिने समर्थपणे उचलली आहे. 1975 साली मुंबईत जन्मलेल्या मल्लिका सागर एका सुशिक्षित आणि व्यावसायिक कुटुंबातून येतात. तिचा करिअर प्रवास पारंपरिक क्रीडा क्षेत्रापेक्षा पूर्णपणे वेगळा राहिला आहे. तिने फाइन आर्ट्स आणि व्यावसायिक लिलाव या दोन भिन्न क्षेत्रांना जोडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणी वाचनाची आवड असलेल्या मल्लिकाने एका कादंबरीतून महिला लिलावकर्तीची भूमिका वाचली आणि तिथूनच तिला या क्षेत्राबद्दल कुतूहल निर्माण झाले. हा क्षण तिच्या आयुष्याचा निर्णायक ठरला.
 

mallika sagar 
 
 
मल्लिका सागरने अमेरिकेतील ब्रिन मॉर कॉलेज, फिलाडेल्फिया येथून आर्ट हिस्ट्रीमध्ये पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने जागतिक दर्जाच्या लिलाव संस्थांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 26 व्या वर्षी तिने न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज या जगप्रसिद्ध लिलाव संस्थेत पहिल्या भारतीय महिला लिलावकर्त्या म्हणून काम करून इतिहास रचला. ही कामगिरी तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख देणारी ठरली. क्रीडा क्षेत्रातील लिलाव नेहमीच पुरुषप्रधान मानले जात होते, पण मल्लिका सागरने ही समजूत बदलून टाकली. 2021 मध्ये तिने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या महिला लिलावकर्त्या म्हणून काम केले. त्यानंतर महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या लिलावाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी तिला सोपवण्यात आली. IPL 2024 मिनी लिलावात तिने आयपीएलमध्ये पदार्पण केले, तर IPL 2025 मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबियात यशस्वीरित्या पार पाडला. अलीकडेच झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या मेगा लिलावातही तिने सूत्रधारपद भूषवले.
 
 
IPL 2026 च्या मिनी लिलावात मल्लिकाची भूमिका फक्त खेळाडू खरेदी-विक्रीपुरती मर्यादित नाही, तर संघांच्या पुढील काही वर्षांच्या रणनीतीचा पाया ठरवणारी आहे. अनुभव, अचूक वेळेचे भान, स्पष्ट संवाद आणि आत्मविश्वास या गुणांमुळे मल्लिका सागर फ्रँचायझींच्या विश्वासार्ह ठरल्या आहेत. लिलावादरम्यान प्रत्येक बोली पारदर्शकपणे, शिस्तबद्ध आणि जलदगतीने पार पाडणे हे मोठे आव्हान असते, आणि मल्लिका सागर हे आव्हान शांतपणे आणि प्रभावी शैलीत पेलताना दिसत आहेत. त्यामुळे आयपीएलच्या मिनी लिलावात खेळाडूंपेक्षा जास्त लक्ष वेधणारी मल्लिका सागर बनली आहे.