नागपूर,
global alumni meet लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची संघटना लिटाची ‘ग्लोबल अॅल्यूम्नी मीट : उडान- 2025-26’ चे 20 व 21 डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देश-विदेशात विविध क्षेत्रांत एलआयटीचा नावलौकिक वाढवणारे माजी आणि विद्यमान विद्यार्थी हजेरी लावणार आहेत. ‘कनेक्टींग ड्रिम्स, इग्नायटिंग सक्सेस’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘उडान 25-26’ चा 20 तारखेला शुभारंभ होणार असून प्रारंभी एलआयटी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील स्व. रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेला सकाळी 10 वाजता माल्यार्पण होणार आहे.
त्यानंतर विद्यापीठाच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता पर्सिस्टंट सिस्टीम, आयटी पार्क येथे माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. रविवारी 21 तारखेला सायंकाळी 6.30 वाजता पर्सिस्टंट हॉल, आयटी पार्क येथे ‘ज्वेल ऑफ एलआयटी’ व ‘युथ आयकॉन’ पुरस्कार वितरण असून मुख्यमंत्री व एलआयटी विद्यापीठाचे संरक्षक देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहिल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोलार ग्रुप इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल व एलआयटी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ गर्व्हनन्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणपती यादव प्रामुख्याने उपस्थित राहतील. तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता एलआयटी विद्यापीठाच्या सभागृहात सिल्वर ज्युबिली व गोल्डन ज्युबिली बॅचेसमधील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल.
नागपुरात 1942 साली स्थापन एलआयटीमधून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक रासायनिक अभियंते व तंत्रज्ञ तयार झाले आहेत. अनेक एलआयटीयन्स भारतातील अग्रणी उद्योग तसेच आंतरदेशीय कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापन पदांवर कार्यरत आहेत. सध्या एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेची सक्रिय संख्या तीन हजारांवर आहे.global alumni meet सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माधव लाभे, सचिव उत्कर्ष खोपकर, विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे व लिटाचे संरक्षक व एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले आहे.