तभा वृत्तेसवा
महागाव,
jagdish-narwade : घरकुल योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळण्यासाठी जमीनमालक जगदीश उत्तम नरवाडे यांच्या सामाजिक पुढाकारातून आमनी येथे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी त्यांच्या मालकीची जमीन उपलब्ध करून देत एकूण 76 लाभार्थी कुटुंबांना खरेदीखत व सातबारा उतारे देऊन जमीन त्यांच्या नावावर केली.
या जागेचा नामकरण उत्तमराव शंकरराव नरवाडे बिटरगावकार नगर या नावाने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी तहसीलदार अभय मस्के, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, तलाठी सीमा कदम, आमनीच्या सरपंच सुनीता राठोड, शंकर चव्हाण, बाबुसिंग राठोड, गजानन गायकवाड, दादाराव चवरे यांचे सहकार्य लाभले.
शासनाला सहकार्य केल्याबद्दल दत्तात्रय कदम यांनी जगदीश नरवाडे यांचा सत्कार केला. लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करून जमीनमालक सिंधू उत्तम नरवाडे, जगदीश नरवाडे, रसिका जगदीश नरवाडे यांचा ग्रामपंचायततर्फे अहेर करून आभार मानले.
जीवनात येऊन समाजास काही देणं लागतो या भावनेतून माझ्या वडिलांनी तीस वर्ष अगोदर लोकांना राहण्यासाठी दिलेली जागा त्यांच्या नावावर सातबारा करून दिला. त्यामुळे सर्वांचे घरकुल मार्ग मोकळा झाला. सर्वांना घरकुलाचा लाभ मिळत आहे, याचा मला आनंद होत आहे.
- जगदीश नरवाडे
संस्थापक अध्यक्ष जनआंदोलन आधार संघर्ष समिती