सरकारच्या आदेशाला बँकांचा खो; अनुदान कर्जात वळते

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
समुद्रपूर, 
samudrapur-news : यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकर्‍यांना या आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी सरकारने अतिवृष्टी पॅकेजची घोषणा करून त्याची अंमलबजावणी केली आहे. शेतकरी सीसीआयला कापसाची विक्री करीत असून हे पैसे थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे. बँकांनी शेतकर्‍यांचे कोणतेही कर्ज वळते करू नये असे आदेश असताना बँकांनी शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. पीक कर्ज व अनुदानाच्या पैशाला होल्ड लावून कर्ज कपात होत आहे.
 
 

J 
 
 
 
बँकांनी शेतकर्‍यांचे कोणतेही कर्ज वळते करू नये किंवा होल्ड लावून नये अशी मागणी करून सरकारच्या आदेशाचे पालन करावे अशी सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे. शेतकर्‍यांना शासन विविध प्रकारचे अनुदान देते. ते अनुदान राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात वळते करण्यात येत आहे ग्राहकाचे बचत खाते होल्ड करून ठेवण्यात येते. शासकीय अनुदान कर्जखात्यात घेण्यात येऊ नये असा शासनाचा आदेश असताना त्या आदेशाची पायमल्ली सुरू आहे. राज्य सरकारने ३१ जुनपर्यंत शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बँकांना सरकारकडून पैसे मिळणारच हे निश्चित आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर आता जगावे असा प्रश्न निर्माण झाला असतांना बँकांची मुजोरी शेतकर्‍यांसाठी गंभीर समस्या निर्माण करीत आहे.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळोवेळी बँकांनी शेतकर्‍यांचे पीक कर्ज वळते करू नये अशा सूचना केल्या आहेत. अतिवृष्टीच्या अध्यादेशातही नमूद आहे. मात्र, बँक व्यवस्थापक सरकारी आदेशापेक्षा मोठे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनुदानाची कोणतीही रक्कम कर्जखात्यात वळती करू नये किंवा बचत खात्याला होल्ड लावू नये व शेतक-यांना नाहक मनःस्ताप देऊ नये अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विलास नवघरे, धिरज लेंडे, किशोर नेवल, रेणुका कोटबंकर, मुरलीधर चौधरी, फकिरा खडसे, राहुल गाढवे, प्रशांत ठाकूर, संदीप शिवणकर आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.