नागभीड/चंद्रपूर,
chandrapur-farmer-news मन हेलावून सोडणारी, माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक अशी घटना पुढे आली असून, एका शेतकर्याला त्याच्यावरील कर्जासाठी चक्क त्याची किडनीच विकावी लागली! चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या मिंथुर गावातील गरीब शेतकरी रोशन कुडे यांच्यावर असलेल्या कर्जासाठी सावकारांकडून होणार्या तगाद्यातून हा लाजीरवाणा प्रकार घडला!! या प्रकरणी सावकारांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कर्जाचा परताव्यासाठी हवालदिल झालेल्या रोशन कुडे याला अखेर सावकाराने किडनी विकायला लावली. या क्रूर प्रकाराने पुरोगामी महाराष्ट्र पुरता हादरला असून, एका बळीराजाची वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल, अशी ही घटना आहे. शेतकरी रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती कधी फायदेशीर ठरलीच नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गाई खरेदी केल्या होत्या. त्यासाठी दोन सावकारांकडून 50-50 हजार रुपये रोशन कुडे यांनी कर्ज घेतले होते. मात्र, येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या. त्यात शेतीही पिकेना. शेवटी कर्जाचा डोंगर वाढतच गेला.
सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामानही विकले. मात्र, कर्ज काही संपेना. एक लाखाचे कर्ज होते. मात्र, व्याजावर व्याज चढून तब्बल 74 लाखावर पाहोचले. सावकाराकडून अशा भरमसाठ व्याजासह वसुली होत होती. कर्ज व्याजासह तब्बल 74 लाखांवर गेल्याने ते अक्षरशः हादरून गेले होते. शेवटी कर्ज देणार्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका दलालाने रोशन कुडे यांना कोलकत्ता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी 8 लाखाला विकली. तरीही कर्ज फिटले नाही.
अन्याय झाला की सामान्य माणूस पोलिस ठाणे गाठतो. तेथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते. मात्र, कुडे यांच्याबाबत तसेही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षकांकडे मी तक्रार दिली. मात्र, त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते, तर माझ्यावर हा दुदैवी प्रसंग ओढवला नसता, असा आरोप कुडे यांनी लावला आहे.
...तर मंत्रालयापुढे कुटुंबासह आत्मदहन ः रोशन कुडे
एक लाख कर्ज घेतले होते. त्याचे आता 74 लाख झाले. अजूनही कर्ज पूर्णपणे फिटलेले नाही. पैशासाठी तगादा सुरूच आहे. कर्जासाठी किडनी गेली. आता हाती काहीच उरले नाही. मंत्रालयापुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू का, असा प्रश्नही शेतकरी रोशन कुडे यांनी उपस्थित केला आहे.
सहा जणांवर गुन्हा दाखलः एसपी मुमक्का सुदर्शन
हे प्रकरण 2020 ते 2021-22 चे आहे. माझ्याकडे आता तक्रार आली. पुराव्याच्या तपासणीसाठी मी स्थानिक ठाणेदारांना निर्देश दिले आणि तक्रार त्यांच्याकडे वर्ग केली. शिवाय अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनाही तिकडे पाठवून चौकशी करायला लावली. संबंधित शेतकर्यांचे म्हणणे होते की, त्यांना त्यांचे पैसे परत हवे बाकी काही नको. त्यांना समजावले. सर्व चौकशीअंती आता आम्ही सावकारांसह सहा आरोपींविरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अनव्ये गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. चौघे आरोपी फरार आहेत, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तभाशी बोलताना दिली.