नागपुरात ५१वा संसदीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

- विद्यापीठ विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
parliamentary-study-class : राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने नागपूर येथे दिनांक ९ ते १३ डिसेंबर दरम्यान ५१वा संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला. या अभ्यासवर्गात रातुम नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातील १२ विद्यापीठांमधील सुमारे ७० विद्यार्थी व प्राध्यापक या अभ्यासवर्गात सहभागी झाले होते. संसदीय लोकशाही, विधिमंडळाची कार्यपद्धती, कायदे निर्मिती प्रक्रिया आणि लोकप्रतिनिधींची भूमिका याबाबत प्रत्यक्ष व सखोल ज्ञान देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
 
 
ngp
 
विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील ८, लोकप्रशासन विभागातील ३, वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील २ आणि बिंझाणी सिटी महाविद्यालयातील २ अशा एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विभागप्रमुख विकास जांभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर नैताम यांच्यासह विद्यार्थ्यांनी अभ्यासवर्गात सहभाग घेतला. अभ्यासवर्गात विविध सत्रांद्वारे मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध शाखांना प्रत्यक्ष भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अभ्यासवर्गाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
 
 
विविध सत्रांमध्ये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाची भूमिका, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी द्विसभागृह पद्धतीतील समन्वय, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी संसदीय आयुक्तांचे महत्त्व, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधींची जबाबदारी, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष संघटनेची भूमिका, विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांनी सत्तारूढ व विरोधी पक्षांची जबाबदारी, तर विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी कायदे निर्मिती प्रक्रियेचे सविस्तर विश्लेषण केले. यदु जोशी यांनी माध्यमे व लोकशाही यांतील नातेसंबंध स्पष्ट केले. समारोप महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय तथा सचिव, राष्ट्रकुल संसदीय मंडळ सचिव–२ मेघना तळेकर आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय अवर सचिव (समिती) प्राजक्ता कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. पाच दिवसांचा हा संसदीय अभ्यासवर्ग ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.