नागपूर,
manali-kshirsagar : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर संशोधन लिखाण करून घेण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी करावा, असे आवाहन कुलगुरू मनाली क्षीरसागर यांनी केले. रातुम नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागात ‘संशोधन पद्धती’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. मदर टेरेसा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास विष्णू चांगदे, प्रफुल्ल शिंदे तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता व कार्यशाळेच्या संयोजिका राजश्री वैष्णव उपस्थित होत्या.

यावेळी पुढे बोलताना प्रगत तंत्रज्ञानाने युक्त मनुष्यबळ घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. एआयमुळे रोजगार कमी होतील, हा गैरसमज असून एआयचा योग्य व नैतिक वापर आत्मसात करणे आवश्यक असल्याचे कुलगुरू मनाली क्षीरसागर यांनी सांगितले. विष्णू चांगदे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये संशोधनाला विशेष महत्त्व दिले असल्याचे नमूद करत सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संशोधनासाठी संशोधन पद्धतींचे सखोल ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले. प्रफुल्ल शिंदे यांनी संशोधनासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली. प्रास्ताविकात राजश्री वैष्णव यांनी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व संशोधन उपक्रमांची माहिती देत, त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर रोजगाराच्या संधी मिळत असल्याचे सांगितले. यावेळी ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेतील विशेष सत्रांमध्ये आशिष लिंगे यांनी ‘संशोधनाचा परिचय’, मेधा कनेटकर यांनी ‘संशोधन रचना व नमुना’, तर राजश्री वैष्णव यांनी ‘डेटा संकलनाची साधने व तंत्रे’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना संशोधन अधिक शास्त्रीय, अचूक व विश्वासार्ह पद्धतीने करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.