कतारला नेपाळ थेट चार्टर विमानाने पाठविणार हत्तींची जोडी!

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
काठमांडू,
Nepal give pair of elephants to Qatar नेपाळ सरकारने कतार सरकारला एक अनोखी आणि विशेष भेट दिली आहे. कतारच्या मागणीनुसार नेपाळकडून एका नर आणि एका मादी हत्तीची जोडी भेट म्हणून पाठवण्यात येत आहे. सोमवारी चितवन राष्ट्रीय उद्यानात आयोजित कार्यक्रमात नर हत्ती खगेंद्र आणि मादी हत्ती रुद्रकली यांना अधिकृत निरोप देण्यात आला. यानंतर या दोन्ही हत्तींना चितवनहून ट्रकद्वारे भैरहवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले आहे. १८ डिसेंबर रोजी कतार एअरवेजच्या खास चार्टर विमानाने या हत्तींची थेट कतारला वाहतूक केली जाणार आहे. हत्तींच्या सुरक्षित प्रवासासाठी विमानात विशेष बदल करण्यात आले असून उड्डाण आणि लँडिंगदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
 
 

Send elephant to Qatar 
चितवन राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य संवर्धन अधिकारी डॉ. गणेश पंत यांनी सांगितले की, कतार सरकारच्या अधिकृत विनंतीनुसार नेपाळ सरकारने ही हत्तींची जोडी भेट स्वरूपात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कतारमध्ये हत्तींची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने ही मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत नेपाळ सरकारने विविध देशांना गेंड्यांची भेट दिली आहे, मात्र पहिल्यांदाच हत्तींची जोडी परदेशी सरकारला भेट देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वन विभागाचे वरिष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ आणि माहिती अधिकारी हरिभद्र आचार्य यांच्या माहितीनुसार, सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या हत्तींची रवानगी करण्यात आली आहे. नर हत्ती खगेंद्र सहा वर्षांचा असून मादी हत्ती रुद्रकली सात वर्षांची आहे. ही अनोखी भेट नेपाळ आणि कतारमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.