पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक केंद्र!

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने केली कोंडी

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
संयुक्त राष्ट्र,
Pakistan is the global center of terrorism संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत शांतता आणि नेतृत्व या विषयावर झालेल्या खुल्या चर्चेदरम्यान भारताने पाकिस्तानला कठोर आणि स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले. भरगच्च सभागृहात भारताने मांडलेली भूमिका पाकिस्तानसाठी अत्यंत अपमानास्पद ठरली. भारताने पाकिस्तानला थेट दहशतवादाचे जागतिक केंद्र संबोधले आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचा ठाम पुनरुच्चार केला. यासोबतच सिंधू पाणी कराराबाबतही भारताने आपली भूमिका स्पष्ट करत, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही, तोपर्यंत हा करार पुनर्संचयित केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
 
 
पाकिस्तानचा अपमान
 
 
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि राजदूत हरीश परावत्नेनी यांनी पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरबाबत केले जाणारे दावे जोरदार शब्दांत फेटाळून लावले. त्यांनी हे दावे पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत, लडाखसह जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्यावर ठाम भर दिला. “हे प्रदेश भारताचे होते, आहेत आणि नेहमीच राहतील,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर करून भारतविरोधी आणि दहशतवादी अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हरीश परावत्नेनी यांनी पाकिस्तानवर सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून असलेल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला. पाकिस्तान सतत विभाजनवादी आणि अस्थिरता निर्माण करणारा अजेंडा राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. दहशतवादाला पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास अधोरेखित करत त्यांनी सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाचे समर्थन केले.
 
भारताने सुमारे ६५ वर्षांपूर्वी सद्भावनेच्या भावनेतून सिंधू करारावर स्वाक्षरी केली होती, मात्र पाकिस्तानने तीन युद्धे छेडून आणि भारताविरुद्ध हजारो दहशतवादी हल्ले करून या कराराच्या मूळ भावनेचा वारंवार भंग केला, असे त्यांनी सांगितले. त्यांनी एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, पाकिस्तानच्या दहशतवादाला दिलेल्या पाठिंब्याचे हे भीषण उदाहरण असल्याचे म्हटले. या हल्ल्यात धार्मिक ओळखीच्या आधारे लक्ष्य केलेल्या २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, असेही त्यांनी अधोरेखित केले. भारताने मांडलेल्या या ठाम भूमिकेमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची कोंडी झाली असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका पुन्हा एकदा ठळकपणे मांडली आहे.