जम्मू-काश्मीरमध्ये सात जिल्ह्यांमध्ये दहशतवादविरोधी छापेमारी

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
जम्मू,
Raids in Jammu and Kashmir जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने (सीआय) सात जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली असून सकाळपासून शोधमोहीम सुरू आहे. श्रीनगरमधील अधिकृत सूत्रांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स (काश्मीर) पथकासह सीआयने पुलवामा, बडगाम, कुलगाम, श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग आणि कुपवाडा येथे छापे टाकले आहेत. या कारवायांमध्ये ऑनलाइन दहशतवादाचे गौरव करणार्‍या व्यक्ती आणि दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि भरती करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लक्ष्य केले गेले आहे.
 
 
raids in jammu and kashmir
 
पोलिसांनी सांगितले की, या छापेमारी दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासाचा भाग आहेत. यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ आणि ५०५ तसेच बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) कलम १३ आणि १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उधमपूर जिल्ह्यातील दुर्गम जंगलात सोमवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक पोलिस कर्मचारी शहीद झाला तर एक दहशतवादी जखमी झाला असल्याचा अंदाज आहे. शहीद पोलिस कर्मचाऱ्याची ओळख अमजद अली खान असे असून तो पठाणटीरचा रहिवासी आणि जम्मू काश्मीर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) चा कमांडो होता.
 
ही चकमक माजलता भागातील सोन गावात पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद गटाशी संबंधित तीन दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरू झाली. जम्मूचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) भीम सेन तुती यांनी सांगितले की, दुर्गम गावात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांची संयुक्त टीम विशेष ऑपरेशन्ससाठी एकत्र काम करत आहे.