राष्ट्रीय लोकअदालतीत २०९४ प्रकरणांचा निपटारा

*६ कोटी १० लाख तडजोड मूल्य

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
वर्धा,
national-lok-adalat : राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २ हजार ९४ प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली. या प्रकरणांचे तडजोड मूल्य ६ कोटी १० लाख ३० हजार ३७० रुपये असल्याचे कळवण्यात आले.
 
 

kl 
 
 
 
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान मिळते, असे विचार मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमुर्ती वृषाली जोशी यांनी राष्ट्रीय लोकअदालत प्रसंगी व्यत केले.
 
 
जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी येथील राष्ट्रीय लोक अदालतीस भेट देऊन विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड उपस्थित होते.
 
 
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७ पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलवर तडजोड पात्र सर्व फौजदारी अपिल व दिवाणी अपिल प्रकरणे, तडजोड पात्र सर्व किरकोट फौजदारी व दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, इलेट्रिसिटी अ‍ॅट प्रकरणे, दिवाणी दावे प्रकरणे, भुसंपादन निगडीत सर्व प्रकरणे, १३८ एनआय अ‍ॅटचे प्रकरणे, कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अंतर्गत प्रकरणे, दरखास्त, विवाह याचिका असे अनेक प्रकरणे ठेवण्यात आली होती.
 
 
जिल्ह्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १ हजार ९०८ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीची रक्कम ५ कोटी १७ लाख २७ हजार ५६६ रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी १८६ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधील तडजोडीचे मूल्य ९३ लाख २ हजार ८०४ इतके होते.
 
 
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून २ हजार ९४ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य ६ कोटी १० लाख ३० हजार ३७० इतके आहे, अशी माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे प्रभारी सचिव गावंडे यांनी दिली आहे.