मूल,
solar-village : तालुक्यातील उथळपेठ गावाने महाराष्ट्रात नवा आदर्श निर्माण केला असून, गावातील विद्युत ग्राहकांनी 180 पैकी 180 घरांवर सौर पॅनल बसवून महाराष्ट्रात सर्वाधिक ‘100 टक्के सौर ग्राम’ म्हणून उथळपेठची ओळख निर्माण केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळावा यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ सुरू करून प्रत्येक भारतीयाला सौर ऊर्जेकडे वळण्याचे आवाहन केले आहे. या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून प्रेरणा घेत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून हे घडले आहे. या उपक्रमाचे लोकार्पण बुधवार, 17 डिसेंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आ. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात राज्यातील ठळक व अव्वल कामगिरीची नोंद उथळपेठ गावाने केली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत शाश्वत विकास ध्येय योजनेतून सुमारे 83 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. या निधीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक ऊर्जेचा लाभ मिळाला असून, वीज बिलात बचत, अखंड वीज पुरवठा तसेच कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्यास मदत झाली आहे.
उथळपेठ गावाचा हा सौर ऊर्जेचा उपक्रम ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘ऊर्जा स्वावलंबन’ आणि ‘शाश्वत विकास’ या राष्ट्रीय उद्दिष्टांना बळ देणारा आहे. ग्रामीण भागातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास शक्य आहे, हे उथळपेठने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.