ईव्हीएमवरील वक्तव्यामुळे सुप्रिया सुळे चर्चेत; मित्रपक्षांसमोर पेच

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Supriya Sule due to her EVM statement मुंबईतून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ईव्हीएमविरोधातील चर्चेवर लोकसभेत बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केवळ विरोधकच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षाची आणि मित्रपक्षांचीही अडचण वाढल्याचे चित्र आहे. “मी याच ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून चार वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे मला कारण दिसत नाही, असे सुळे म्हणाल्या.
 
 
 
supriya sule on evm
सुप्रिया सुळेंच्या या विधानामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेशी थेट विसंगती निर्माण झाली आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माळशिरस मतदारसंघातील आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडले होते. त्यांनी मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घेण्याची मागणी करत थेट आपल्या गावात प्रतीकात्मक पेपर-बॅलेट मतदानही आयोजित केले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते प्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी गावात पोहोचले होते. शरद पवार यांनी त्या वेळी ईव्हीएमच्या निकालांवर शंका उपस्थित करत मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान पद्धत पुन्हा विचारात घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांनी ईव्हीएममधील आकडेवारी विसंगत असल्याचा दावा करत, मरकडवाडीतील लोकांनी देशाला दिशा दाखवली असल्याचेही सांगितले होते. जानकर यांनी तर ईव्हीएम छेडछाडीचा दावा करत तब्बल १.७६ लाख मतदारांची प्रतिज्ञापत्रे सादर केली होती.
 
 
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील विधान पक्षाच्या आधीच्या भूमिकेला छेद देणारे ठरले आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) हेही ईव्हीएमविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या ‘मत चोरी’ या आरोपांना समर्थन देत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा परिस्थितीत, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी घेतलेली वेगळी भूमिका महाविकास आघाडीतील समन्वयासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला मित्रपक्ष ईव्हीएमविरोधी भूमिका घेत असताना, दुसऱ्या बाजूला सुळे यांनी ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.