जिल्ह्यातील 750 बंधार्‍यांमुळे रब्बी पिकांना संजीवनी !

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
गडचिरोली,
rabi crops जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘वनराई बंधारे’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे शेतीला नवी दिशा मिळाली आहे. खरीप हंगामानंतर रब्बी पिकांसाठी संरक्षित सिंचन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक गावांत 750 वनराई बंधार्‍यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
 

rabbi crop 
 
 
शेतकरी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या वनराई बंधार्‍यांमुळे पावसाचे पाणी अडवले जात असून, भूजल पातळीत वाढ होत आहे. परिणामी, परिसरातील शेतकरी व शेतकरी गटांना रब्बी हंगामातील भाजीपाला व कडधान्य पिकांसाठी आवश्यक असलेले संरक्षित सिंचन उपलब्ध झाले आहे. या उपक्रमाचा थेट सकारात्मक परिणाम जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रावर दिसून येत असून, रब्बी हंगामातील भाजीपाला व कडधान्य पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. सन 2025-26 या वर्षात सहायक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी यांनी क्षेत्रीय पातळीवर प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 750 हून अधिक वनराई बंधारे पूर्ण झाले आहेत.rabi crops अनेक ठिकाणी बांधलेल्या बंधार्‍यामुळे मका, उडीद, मूग पिकाला पाणी उपलब्ध झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हाभर वनराई बंधारे बांधण्यात आले.

वनराई बंधार्‍यांमुळे जलसंधारण तर होईलच. शिवाय रब्बी पिकांसाठी सिंचनाची सोय होईल, बंधार्‍यातील पाण्याच्या आधारे कमी पाण्याचा वापर होणारी पिके सहज घेता येतील. हे बंधारे शेतकर्‍यांसह पाळीव व वन्यप्राण्यांसाठी फायदेशीर ठरतील.
प्रीती हिरळकर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी