वर्धा,
threat-to-rob-the-shop : झोपेच्या गोळ्या घेण्यासाठी मेडिकलमध्ये आलेल्या तरुणाने मेडिकल मालकाला १० हजार रुपये द्या, नाहीतर तुझे दुकान लुटतो, असे म्हणत शिवीगाळ करीत चाकूने हल्ला केला. याप्रकरणी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कार्तिक बिलवाल (२५) रा. हनुमाननगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १५ रोजी दयालनगरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सतीश शादिजा (५५) रा. दयालनगर यांचे कोमल मेडिकल आहे. सोमवार १५ रोजी रात्री ७.१५ वाजता कार्तिक बिलवाल हा त्यांच्या मेडिकलमध्ये आला आणि झोपेच्या गोळ्या व पैशांची मागणी केली. झोपेच्या गोळ्या नाही असे सांगत तुला कशाचे पैसे देऊ, असे सतीश शादिजा यांनी म्हटले. त्यावर बिलवाल याने आता तू १० हजार रुपये दे नाहीतर तुला चाकूने मारून दुकान लुटतो, अशी धमकी दिली. चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला. बिलवाल काउंटरवरून चढून तो मेडिकलच्या आत शिरला आणि मारण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याच्या सोबत असलेल्या वसीम नावाच्या मुलाने मध्यस्थी करून त्याला दुकानाबाहेर घेऊन गेला. सतीश शादिजा यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.