नवी दिल्ली,
Two brothers murdered in Delhi दिल्लीतील जाफराबाद परिसरात मंगळवारी रात्री भीषण दुहेरी हत्याकांड घडले असून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दोन भावांवर अंदाजे ४० राउंड गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तात्काळ परिसराला घेराव घालत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना जाफराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ऋषी कर्दम मार्गावरील चौहान बांगर परिसरात घडली.

या गोळीबारात नदीम (वय ३५) आणि फजील (वय ३०) या दोन भावांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात या हत्याकांडामागे वैयक्तिक वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून मावशीच्या मुलांवर या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून भांडणामागील नेमके कारण आणि जुने वाद तपासले जात आहेत.
घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. जाफराबाद पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम १०३(१)/३(५) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५ आणि २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.