कारंजा (घा.),
sumit-wankhede : तालुक्यातील कार नदी प्रकल्प रस्त्यावरील खैरी ते सेलगाव (ल.) या मार्गांवरील नदीवर सुरू असलेल्या पुलाचे काम जवळपास सात महिन्यापासून रखडले होते. त्यामुळे याबाबत परिसरातील नागरिकांनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शेटे यांच्या नेतृत्वात आ. सुमित वानखेडे यांना निवेदन देऊन त्वरित काम सुरू करण्याची मागणी केली होती. या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. हा पूल सध्या बंद असल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्या मार्गाने नागरिकांचे दळणवळण बंद झाल्याने नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

सेलगाव लवणे ते खैरी धरण या रस्त्यावरील नदीवर जवळपास २ कोटी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. या पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या रहादारिकारिता तात्पुरता तयार केलेला वळण रस्ता पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला. या नदीला येणार्या पुरामुळे सेलगाव, खैरी धरण, बिहाडी, मदणी, परसोडी, काकडा, येथील जनतेचा संपर्क तुटतो म्हणून या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. नदीच्या दोन्ही बाजूला परिसरातील लोकांची शेती आहे. नदीचे पात्र मोठे असल्याने वाहत्या पाण्यातून नागरिकांना येणे जाणे करणे शय नव्हते. पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने नागरिकांना जवळपास १५ ते २० किलोमीटरचा फेरा मारून शेतात जावे लागते. पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने या परिसरातील शेतकर्यांना जवळची व मोठी बाजारपेठ असलेल्या काटोल येथे जाताना अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाजारपेठ या परिसरातील भाजीपाला, फळ उत्पादक शेतकर्याकरिता महत्त्वाची व जवळची बाजारपेठ आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत इतरत्र जावे लागत आहे.
अपूर्ण पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे यासाठी या परिसरातील शेतकर्यांनी आ. सुमीत वानखडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले होते.