जिल्हा क्रीडा कार्यालय नियोजनात ढांग; कर थकबाकीदारीत अव्वल!

*वसुलीसाठी नपची दमछाक

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-news : शहराच्या विकासाकरिता शासनाकडून निधी येत असला तरी मालमत्ता करातून नगरपालिकेच्या वतीने शहरातील अनेक विकासकामे केल्या जातात. नागरिक कर भरताना आखुडता हात घेतात. आता त्या पाठोपाठ शहरातील शासकीय कार्यालयांनी देखील थकबाकीत मोठी आघाडी घेतली आहे. जिप, पंस, तहसील, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, उपविभागीय कार्यालय, जिल्हा ग्रामोद्योग या कार्यालयांकडे नपचा लाखोंचा कर थकीत आहे. तर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने ६५ लाख ४० हजार ९८० रुपये सर्वाधिक कर थकवून आघाडी घेतली आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुल आणि कार्यालयाच्या नावाने नियोजन वा प्रशिक्षणाची बोंब असल्याची ओरड असतानाच शासकीय करही थकवल्याचे पुढे आले आहे.
 
 
k
 
शहरातील सात शासकीय कार्यालयांकडे नगरपालिकेच्या विविध करांची सुमारे १ कोटी रुपयांची थकबाकी आहे. नगरपालिकेच्या वसुली पथकाने वेळोवळी नोटीस पाठवूनही थकबाकी भरली जात नाही. त्याचा थेट परिणाम शहराच्या विकास कामांवर होत असल्याचेही दिसून येत आहे. मालमत्ता कर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो. मात्र, त्याचीच दरवर्षी मोठी थकबाकी असते. निवासी थकबाकीदारांसह व्यावसायिक व सरकारी कार्यालयेही यात मागे नाही. नगरपालिका हद्दीतील सरकारी कार्यालयांकडे १ कोटींची थकबाकी आहे. नपने यंदा मालमत्ता कराचे १२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यातील आतापर्यंत केवळ २४ टके कर वसुली झाली. मार्च अखेर थकबाकी वसुली होणे गरजेचे असल्याने कर विभागाने थकबाकीदारांना नोटीस बजावल्या. नगर परिषद हद्दीत असणार्‍या जिल्हा परिषद कार्यालयापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत तसेच काही नावाजलेल्या संस्थांचा देखील मालमत्ता कर थकीत आहे.
 
 
नववर्षाच्या प्रारंभी, जानेवारीपासून वसुली पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांकडून कर वसुली करतात. सामान्यांकडून याला प्रतिसाद मिळतो. नगरपालिकेचा मार्च अखेरपर्यंत १०० टके मालमत्ता करवसुलीचा संकल्प आहे. थकबाकीदारांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आघाडीवर असून या कार्यालयाकडे चालू वर्षाचा ६५ लाख ४० हजार ९८० रुपये इतका प्रचंड कर थकीत आहे. नगरपालिकेच्या कर विभागाकडून क्रीडा विभागाला वेळोवेळी देयके, स्मरणपत्रे दिली. मात्र, या कार्यालयाकडून कर भरण्यास प्रतिसाद दिला जात नाही. क्रीडा कार्यालयातील अधिकारी शासनाकडून अनुदानच येत नसल्याचा कांगावा केल्या जाते.
दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सर्वाधिक कर थकीत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने याबाबतची मुख्यालयाला माहिती दिली आहे. मार्च अखेरपर्यंत कर भरण्याचे आश्वासन देण्यात आले असून त्यानंतर कर न भरल्यास पुढील कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रीया नपच्या कर निरीक्षक प्रयोजा नेम्मीनवार यांनी तरुण भारतला दिली.
 
 
कोणत्या कार्यालयाकडे किती कर थकीत?
 
कार्यालयाचे नाव थकीत रकम
 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय : ६५,४०,९८०
जिल्हा परिषद व पंचायत समिती : १६,०००००
तहसील कार्यालय : २,६५,६००
म.रा. परिवहन महामंडळ : १,९०,३२४
उपविभागीय कार्यालय : ३,०५,३७६
जिल्हा ग्रामोद्योग : १,१४,४४०