वाशीमचे सी.एस. डॉ. कावरखे पुन्हा राज्यात ’सर्वोत्कृष्ट’!

नियमांचे पालन आणि सहकार्‍यांशी समन्वय

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
वाशीम, 
Anil Kavarkhe : कर्तृत्ववान नेतृत्वाच्या हाती सूत्रे आल्यास अशयप्राय वाटणारी कामेही कशी सहज शय होतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालय! राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील ऑटोबर महिन्याच्या रँकिंगमध्ये वाशीमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. ही केवळ आकडेवारीची किमया नसून, गोरगरीब रुग्णांचे आरोग्य सुदृढ करण्याची तळमळ आणि सहकार्‍यांना कुटुंबाप्रमाणे सोबत घेऊन चालण्याची त्यांची संवेदनशील कार्यशैली हेच या यशाचे खरे गमक आहे.
 
 
 
K
 
 
काहीतरी नवीन आणि अर्थपूर्ण करण्याची त्यांची सकारात्मक मानसिकता, वरिष्ठांशी असलेला उत्तम समन्वय आणि दूरदृष्टी यामुळेच वाशीमचे नाव महाराष्ट्राच्या आरोग्य नकाशावर तेजस्वीपणे झळकत आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत मातृ आरोग्य, बालआरोग्य, कुटुंबनियोजन अशा ३० महत्त्वाच्या निर्देशकांवर आधारित आरोग्य विभागाच्या पथकाने ऑटोबर २०२५ मध्ये जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची कसून पाहणी व पडताळणी केली होती. या पाहणीत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयात पुरविण्यात येणार्‍या सेवांना पथकाने सर्वोत्कृष्टतेचा शेरा दिला आहे.
 
 
महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठीची वात्सल्यपूर्ण सेवा, अद्ययावत डायलिसीस सुविधा, कुपोषित बालकांसाठीचे पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी)‡जेथे मायेने पोषण केले जाते. गंभीर रुग्णांसाठीचे आयसीयू, अत्याधुनिक आणि सुसज्ज शस्त्रक्रियागृहे या सर्व सेवा उत्कृष्ट आणि विश्वासार्ह दर्जाच्या असल्याचे नमूद करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तपेढी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन अशा जीवनदायिनी सुविधा येथे सज्ज आहेत.
 
 
११ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या या अहवालात डॉ. अनिल कावरखे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गाच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केले आणि वाशीमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. यापूर्वी, मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यातही त्यांनी अशीच उत्कृष्ट आणि नेत्रदीपक कामगिरी केली होती, हे येथे नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे.
 
 
पूर्वी निर्देशांक अंमलबजावणीत वाशीम जिल्हा ’टॉप फाईव्ह’मध्येही नव्हता. मात्र, सुमारे अडीच वर्षांपूर्वी डॉ. अनिल कावरखे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सकारात्मक बदलांची एक नवी पहाट उगवली. कर्मचार्‍यांना आस्थेची वागणूक आणि रुग्णांशी सौजन्यपूर्ण संवाद यामुळे केवळ आरोग्य संस्थांमध्ये मूलभूत व भौतिक सुविधांची उपलब्धता झाली नाही, तर नियमित स्वच्छता व शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे शासकीय आरोग्य सेवांवरील सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा बहरला.
 
 
आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे बहुमोल मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत आहे. या संपूर्ण यशाचे श्रेय माझ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बांधवांच्या समर्पित भावनेला समर्पित आहे. सर्वांच्या एकत्रित, प्रामाणिक प्रयत्नांतूनच वाशिमचा आरोग्य विभाग राज्यात अग्रक्रमांकावर आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. यापुढेही अधिक प्रभावी आणि संवेदनशीलपणे आरोग्य सेवा पुरविणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील.
डॉ. अनिल कावरखे, जिल्हा शल्यचिकित्सक