कारंजा लाड,
Sanjay Deshmukh : येथील नगरपरिषद हद्दीतील यशोदा नगर १, २, ३ व गायकवाड नगर येथील जवळपास २०० हून अधिक कुटुंबांचा एकमेव आवागमन मार्ग संरक्षण संपदा विभागाने बंद केल्यामुळे परिसरातील नागरीकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खा. संजय देशमुख यांनी थेट केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

सदर वसाहतींचा मुख्य रस्ता संरक्षण खात्याच्या जमिनीतून जात होता. ले-आऊट विकासाच्या वेळी तहसीलदारांची विधिवत मान्यता असल्याने नागरिकांनी कायदेशीररित्या भूखंड खरेदी करून घरे बांधली. मात्र, संरक्षण विभागाने मोजणी दरम्यान ले - आऊटचा काही भाग संरक्षण संपत्तीतयेत असल्याचे निदर्शनास आणून देत सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे वसाहतीचा एकमेव मार्ग बंद झाला आहे. परिणामी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच आपत्कालीन सेवांना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. हा परिसर महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम, १९६६ च्या कलम १५० अंतर्गत दीर्घकाळापासून वसलेला असतानाही अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.त्यामुळे मानवीय दृष्टिकोनातून किमान ९ मीटर रुंद व १०० मीटर लांबीचा आवागमन मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश संरक्षण संपदा विभागाला देण्यात यावेत, अशी मागणी खा. देशमुख यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.