मालेगांव,
gold-rings-stolen : तालुक्यातील नागरतास पुलाजवळ दोन इसमाना मोटार सायकलवर आलेल्या दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या जवळील सोन्याच्या दोन अंगठ्या अलगदपणे चोरून नेल्याची घटना १४ डिसेंबर रोजी घडली.
याबाबत सविस्तर असे की, संतोष आत्माराम ठोंबे रा. पारडी ताड तालुका मंगरूळनाथ व सोपान तुकाराम चौधरी रा. तोरणाळा तालुका वाशीम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते बोर्डी तालुका मालेगाव येथील कुंकवाचा कार्यक्रम आटोपून नागरतास कडून मालेगाव कडे येत असतांना त्यांना मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञातांनी आम्ही पोलिस आहोत असे सांगुन त्यांची मोटर सायकल उभी करण्यास सांगीतले. नुकतीच एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेलेली आहे. तुमच्या हातातील सोन्याचे अंगठ्या काढून खिशात ठेवा असे सांगीतले.
फिर्यादींनी त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या चोरट्यांनी दिलेल्या एका कागदामध्ये ठेवल्या. हा कागद खिशात ठेवा असे सांगुन त्यांनी त्या ठिकाणाहून मोटरसायकलवर पोबारा केला. त्यानंतर लगेच या दोघांना संशय आल्याने त्यांनी कागदातील अंगठ्या तपासून पाहिल्या असता एकाच्या कागदामध्ये डुप्लिकेट अंगठी ठेवण्यात आली होती तर दुसर्याच्या रुमालात फक्त गाठ मारून ठेवली होती. त्यामुळे त्यांनी तशा प्रकारची फिर्याद मालेगांव पोलिस स्टेशनला दिली. त्यावरुन मालेगाव पोलिसांनी दोन अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रवी सैबेवार हे करीत आहेत.