नवरीची घोड्यावरुन वरात

सामाजीक जाणीवेचा नवा अध्याय

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
वाशीम, 
washim-news : लग्न म्हटले तर घोड्यावरुन वरात निघणार ही बाब आधोरेखीत आहेत. परंपरेनुसार घोड्यावर नवरदेव बसतो. आज मुलांप्रमाणे मुलीसुध्दा प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. मुलगी सुध्दा वंशाचा दिवा आहे ती एका घरासोबत दोन घरांमध्ये प्रकाशाची ज्योत निर्माण करीत असते. असे असले तरी मुले आणि मुलींमधील भेदभाव कमी होतांना दिसत नाही. मात्र काही जण आजही मुलगा आणि मुलगी समान मानून त्याप्रमाणे कार्य करतात.
 
 

K
 
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील संतोष जोशी व जयश्री जोशी यांनी आपली मुलगी धनश्री जोशी हिच्या विवाहामध्ये स्वत:च्या मुलीला घोड्यावर बसून गावातून वरात काढून सामाजीक जाणीवेचा नवा अध्याय व आदर्श निर्माण केला आहे. आई वडीलांनी एक नवीन पायंडा रचला आहे. यापूर्वी मोठ्या मुलींचा विवाह सुध्दा त्यांनी अशाच प्रकारे केला होता हे विशेष. धनश्री हिचे लग्न आदित्यकुमार सुनिल शर्मा यांच्याशी नुकतेच संपन्न झाले. प्रत्येक आई वडील मुला-मुलींना जन्म देण्यापूर्वीच त्याच्या भविष्याची चिंता करतात. अनेक जण मुलीला जगामध्ये येण्यापूर्वीच तिची हत्या करण्याचे पापही करतात. मुलींच्या लग्नाची चिंता, शिक्षणाची चिंता त्यामुळे लहान पणापासूनच मुलांपेक्षा मुलीला सापत्नक वागणूक दिल्या जाते. मात्र आज राजकीय सामाजीक, औद्योगिक व प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपले कर्तव्य निर्माण करुन प्रगतीचा झेंडा रोवला आहे.
 
 
 
मुलगी आणि मुलगा हा एक समान असल्याचा नारा जोशी परिवाराने देत आपल्या मुलीची घोड्यावरुन वरात काढली. महिला सशक्तीकरणाचे पर्व सद्या सुरु असून, झाशी ची राणी, इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, प्रतिभाताई पाटील या समवेत अनेक कर्तबगार महिला जगाचा आदर्श आहेत. जोशी परिवाराने मुलगा आणि मुलगी समान मानून केवळ घोड्यावर बसण्याचा अधिकार वराला नसून वधूलाही आहे. हे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सिध्द केले आहे. आई वडीलांचा हा आदर्श अनुकरनीय आहे. सदर नवरीच्या वरातीची चर्चा जिल्ह्यामध्ये सुरु आहे.