श्री च्या जन्मोत्सव सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

४५ दिवसांचा दिव्य सोहळा, भाविकांची उत्सुकता शिगेला

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड, 
shris-birth-anniversary-celebration : दत्तात्रय प्रभूंचा दुसरा अवतार मानल्या जाणार्‍या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ७२६ व्या जन्मोत्सवाचा भव्य आणि भक्तिभावपूर्ण प्रारंभ येत्या २२ डिसेंबरपासून कारंजा येथील गुरुमंदिरात होत असून, तब्बल ४५ दिवस चालणार्‍या या आध्यात्मिक महोत्सवाची उत्सुकता भाविकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. २ फेब्रुवारी रोजी शैलगमन यात्रेने या महोत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने भाविकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
 
 

SHRI 
 
 
 
सोमवार २२ डिसेंबर रोजी जन्मोत्सवाची विधिवत सुरुवात होणार आहे. २३ डिसेंबरला कलशस्थापना झाल्यानंतर अखंड गुरूचरित्र पारायणास प्रारंभ होईल. त्यानंतर २४ डिसेंबर ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील नामवंत कलाकार, पुरुष व महिला भजनी मंडळे श्रींच्या चरणी सेवा अर्पण करणार आहेत. या काळात सुशीलबुवा देशपांडे (कारंजा), राजेंद्रबुवा मांडेवाल (मुंबई), अविनाशबुवा परळीकर (कारंजा), शरदबुवा घाग (नृसिंहवाडी), प्रज्ञा देशपांडे (पुणे), दिगंबरबुवा नाईक (नागपूर), कौस्तुबबुवा परांजपे (पुणे), अंजली पिंजरकर (कारंजा), संगीता गलांडे (नागपूर), अश्विनी सस्तकर (कारंजा) आदी किर्तनकार किर्तनसेवा सादर करणार आहेत. तसेच अजित कडकडे, प्रथमेश लघाटे, मुग्धा लघाटे-वैश्यंपायन, पं. कृष्णेन्द्र वार्डीकर (हुबळी), पं. भुवनेश कोमकली (देवास), हेमांगी नेने (हैदराबाद) यांच्या सुमधुर गायनाने भक्तिरस ओसंडून वाहणार आहे.
 
 
प्रवचनमाला, भक्तिसंगीत, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आदी उपक्रमही या उत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहेत. उत्सवाच्या उत्तरार्धात २९ जानेवारीला रुद्र स्वाहाकार व शतचंडी स्वाहाकार यज्ञ, ३० जानेवारीला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा सत्संग, ३१ जानेवारीला श्री वसंतपूजा, १ फेब्रुवारीला श्रींचा पालखी सोहळा, तर २ फेब्रुवारीला यज्ञ पूर्णाहुती, महाप्रसाद आणि सायंकाळी श्री शैलगमन शोभायात्रा काढण्यात येणार आहे. श्रींची पालखी शहरातील प्रमुख मार्गांवरून परिक्रमण करीत ३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत गुरुमंदिरात पोहोचल्यानंतर जन्मोत्सवाची सांगता होईल.
 
 
जन्मोत्सवानिमित्त गुरुमंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. या भव्य सोहळ्याची पूर्वतयारी आणि उत्सव काळातील सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावेत, यासाठी श्री गुरुमंदिर संस्थान उत्सव समितीने काटेकोर नियोजन केले आहे.या पावन जन्मोत्सव सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुमंदिर संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.