तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
devendra-fadnavis : उमरखेड तालुक्यातील सोईट (महागाव) येथील एका शेतात घुसून शेतकरी परिवाराला ओम खोपे तसेच त्याच्या साथीदारांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणात कारवाई करीता बिटरगाव पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अन्यायग्रस्त शेतकरी कुटूंबाने यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन तक्रार केली. पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केल्यामुळे सावकार तसेच पोलिस पुन्हा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याने शेतकरी कुटूंब हादरले असून थेट ‘देवा’भाऊंच्या दरबारात न्याय मागणार आहे.
उमरखेड तालुक्यातील सोईट (महागाव) येथील पद्मीना राम पोहरकर, विठ्ठल राम पोहरकर व शिवा राम पोहरकर या तिघांनी ओम खोपे याच्याविरोधात उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांच्याकडे लेखी तक्रार करून त्याने जबरदस्तीने खरेदी खताद्वारे जमीन हडपल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एका एकर जमिनीवर व्यवहार करण्याचे ठरले असतानाही, खोपे याने जबरदस्तीने संपूर्ण 1 हेक्टर 9 आर शेती आपल्याच नावावर खरेदीखताद्वारे नोंदवून घेतल्याचा आरोप पोहरकर यांनी केला आहे.
हे प्रकरण सध्या दिवाणी न्यायाधीश, कक्ष क उमरखेड यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. पद्मीना पोहरकर व त्यांच्या परिवाराने या खरेदीखताची वैधता रद्द करून झालेल्या फसवणूक विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे जो न्याय मिळेल त्यानुसार आम्ही वागायला तयार असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे. शेत रिकामे करण्यासाठी आरोपी पोलिसांना सोबत घेऊन मानसिक तसेच शारीरिक छळ करीत असून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘देवा’भाऊंना न्याय मागणार
दिनांक 18 नोव्हेंबर रोजी आरोपी ओम अंबादास खोपे, यदुराज वानखडे, अंबादास खोपे तसेच ट्रॅक्टरचालकांनी शेतात घुसून विठ्ठल राम पोहरकर, लक्ष्मण पोहरकर, शिवा राम पोहरकर, पद्मीना पोहरकर यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यासंदर्भात बिटरगाव पोलिसांनी तक्रार न घेता मेडीकलसुद्धा करून घेतले नाही. त्यामुळे पोहरकर कुटुंबाने यवतमाळ येथे पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र आता तक्रार केल्यामुळे आरोपी पोलिसांसोबत संगनमत करून पुन्हा त्रास देत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आपबीती कथन करणार असल्याचे शेतकरी कुटुंबाने सांगितले.