गोंदिया,
Gondia revenue officers strike, शासनाकडून संगणकासह अत्याधुनिक संसाधने दिली जात नसल्याने तलाठ्यांनी आभासी कामे बंद केली असताना आता महसूल अधिकारी व कर्मचार्यांनी 19 डिसेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. विनाचौकशी होणार्या निलंबनाच्या घोषणांमुळे तसेच महसूल विभागाच्या दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांचा निपटारा न झाल्याने जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ शाखा गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
कुठलिही तक्रार झाली तर चौकशी न करताच महसूल मंत्र्यांकडून थेट विधिमंडळातच अधिकारी व कर्मचार्यांच्या निलंबनाच्या घोषणा केल्या जातात. अधिकारी-कर्मचार्यांची बाजू ऐकून घेतली जात नसल्याने त्यांच्यामध्ये भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नैसर्गिक न्यायाने कारवाई व्हावी अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी विधी मंडळात कोणतीही चौकशी न करता 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकार्यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 13 डिसेंबरला भंडारा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच पालघर जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकार्यांवरही कारवाई जाहीर करण्यात आली. ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांविरोधात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या सर्व निलंबन आदेश तत्काळ मागे घ्यावेत, महसूल विभागातील नायब तहसिलदार पदाच्या ग्रेड पे बाबत प्रलंबित मागणी, महसूल सहाय्यक यांच्या वेतनश्रेणीतील तृटी, तसेच महसूल सेवक यांच्या मागण्याबाबत, विविध सेवा विषयक आणि आर्थिक बाबींसंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी संघटनेने निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, ज्योती कांबळे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, पुजा गायकवाड, कविता गायकवाड, तहसिलदार समशेर पठाण यांच्यासह 60 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वर्षभरात 56 जणांवर कारवाई
जानेवारीपासून आतापर्यंत 28 नायब तहसीलदार, तहसीलदार, 4 उपजिल्हाधिकारी, 8 मंडळ अधिकारी, 14 ग्राम महसूल अधिकारी व इतर कर्मचार्यांवर निलंबन व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे महसूल अधिकारी व कर्मचारी प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. याबाबत संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून 19 पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.