नाशिक,
Admitted to Kokate Hospital नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरुद्ध अटक वॉरंट जारी केले असून, त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. सदनिका घोटाळाप्रकरणातील दोन वर्षांची शिक्षा कायम राहिल्यानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटेंविरुद्ध अटक वॉरंटासाठी अर्ज दाखल केला होता आणि आज न्यायालयाने तो मान्य केला. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माणिकराव कोकाटें यांनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तातडीने धाव घेतली असून, तिथे शिक्षेवर स्थगिती मिळविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या ते रुग्णालयात दाखल असून, त्यांच्या प्रकृतीची माहिती न्यायालयाला दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कोणतीही कारवाई होणार नाही, असा तातडीचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर माणिकराव कोकाटें यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आवश्यक होऊ शकतो.
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटें यांनी हायकोर्टात आपली याचिका दाखल केली असून, बनावट कागदपत्रांवर आधारित शासकीय लाभ घेण्याच्या प्रकरणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक वॉरंटामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे, आणि कोकाटेंच्या अडचणी वाढू शकतात अश्या चर्चा सुरु आहे.