ओटावा,
Changes to Canadian citizenship rules कॅनडाच्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. कॅनेडियन सरकारने नागरिकत्वाच्या नियमांमध्ये बदल करत, परदेशात जन्मलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या मुलांसाठी नागरिकत्व मिळवणे सोपे केले आहे. १५ डिसेंबर रोजी लागू झालेल्या विधेयक C-3 द्वारे नागरिकत्व हक्कांची व्याप्ती आता अधिक विस्तृत करण्यात आली आहे. हा बदल विशेषतः परदेशात राहणाऱ्या कुटुंबांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जिथे मुले कॅनडाबाहेर जन्माला येतात. कॅनडामध्ये भारतीय वंशीय लोकसंख्या मोठी असल्यामुळे हा नियम भारतीय समुदायासाठीही स्वागतार्ह ठरेल.
नवीन तरतुदीनुसार, जर कॅनेडियन नागरिक पालक त्यांच्या मुलाच्या जन्मापूर्वी किंवा दत्तक घेण्यापूर्वी किमान तीन वर्षे (१०९५ दिवस) कॅनडामध्ये वास्तव्य करत असेल, तर त्यांना त्यांच्या परदेशी जन्मलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या मुलासाठी नागरिकत्व मिळू शकेल. यामुळे नागरिकत्वाची पात्रता फक्त पहिल्या पिढीपुरती मर्यादित न राहता, पुढील पिढ्यांनाही लागू होईल.
२००९ मध्ये लागू झालेल्या आधीच्या नियमांनुसार, परदेशात जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांवरून नागरिकत्व मिळणे बंद केले होते, ज्यामुळे अनेक कुटुंबांना त्रास झाला होता. डिसेंबर २०१३ मध्ये ओंटारियो सुपीरियर कोर्ट ऑफ जस्टिसने हा नियम असंवैधानिक ठरवला, ज्यामुळे सरकारने नागरिकत्व कायद्यात सुधारणा करत विधेयक C-3 लागू केले. या नवीन नियमांनुसार, परदेशात जन्मलेल्या मुलांना आता थेट नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल आणि पूर्वी मर्यादित असलेले सर्व अधिकार त्यांना मिळतील. यामुळे कॅनडातील भारतीय वंशीय आणि इतर समुदायांसाठी नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.