बीजिंग,
Chinese research on male fertility पुरुषांच्या प्रजनन क्षमतेविषयीचे जगभरात वाढते चिंताजनक निष्कर्ष आता चीनच्या नव्या संशोधनातून समोर आले आहेत. सामान्यपणे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर खुलेपणाने चर्चा केली जात नाही, आणि अनेक पुरुष त्यांच्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करतात, जे थेट प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात. मागील ५० वर्षांत विविध अहवालांतून असे दिसून आले आहे की, जगभरातील पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गतिशीलता झपाट्यानं कमी झाली आहे. विशेषतः २००० नंतर उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील पुरुषांमध्ये ही घट अधिक चिंताजनक स्वरूपाची असल्याचे संशोधन दर्शवते. जीवनशैलीतील बदल आणि वातावरणातील रसायनांचा या घटीत महत्त्वाचा वाटा आहे.

चीनमधील फुदान युनिव्हर्सिटीने या विषयावर संशोधन करत पुरुष प्रजनन आरोग्यासाठी 'टारगेटेड' उपचार विकसित केले आहेत. संशोधकांनी उंदरांवर चाचण्या करून पाहिल्या, ज्यामध्ये त्यांना उष्ण, नॉन-स्टिक प्लास्टिक PTFE आणि लेड यासारख्या पदार्थांशी संपर्कात ठेवले. यामुळे त्यांच्या शुक्राणूंची गती कमी झाली, परंतु नंतर उंदरांच्या अंडकोषांच्या त्वचेला SKAP2 नावाच्या प्रोटीनयुक्त हायड्रोजेलने उपचार केल्यास शुक्राणूंची गती सुधारली. प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर मानवी चाचण्या देखील पार पडल्या आणि त्यातून सकारात्मक निष्कर्ष मिळाले. या संशोधनामुळे पुरुष प्रजनन क्षमतेच्या सुधारासाठी नवीन आणि केंद्रीत उपचार शोधण्यास मोठा मार्ग मोकळा झाला आहे. या अभ्यासामुळे भविष्यात पुरुषांच्या प्रजनन आरोग्याला पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे.