थंडीमध्ये विद्यार्थी असतात बसच्या प्रतीक्षेत

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
cold-weather : आर्णी ते लोणी 15 किमी अंतराच्या मार्गावर एसटी बस वेळेवर न धावल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचा गंभीर प्रकार सोमवारी समोर आला. विद्यार्थ्यांना उशिरापर्यंत ताटकळत उभे राहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे. नेहमीच घडणारा हा प्रकार थांबवण्यात यावा, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
 
 
 
K
 
 
 
लोणी येथील विद्यार्थी शिक्षणासाठी सकाळी आर्णी येथे ये-जा करतात. शाळा पाच वाजता सुटते. मात्र, संध्याकाळी एसटीबस वेळेवर न पोहोचल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास बसस्थानकावर थांबावे लागत असल्याची तक्रार आहे. सोमवारी शाळा 5 वाजता सुटूनही आर्णी बसस्थानकावर एसटी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अखेर बस रात्री उशिरा सुटल्याने लोणी येथील विद्यार्थी सुमारे रात्री आठ वाजता गावात पोहोचले.
 
 
या बसमध्ये दोन मुली व दहा मुले प्रवास करीत होते. या प्रकारामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाèयांकडे नाराजी व्यक्त केली. एसटी बसच्या वेळापत्रकातील अनियमितता थांबवून विद्यार्थ्यांसाठी वेळेवर व नियमित बससेवा सुरू करावी, या घटनेची दखल घेऊन संबंधित अधिकाèयांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली.
 
 
विद्यार्थी वेळेवर घरी न पोहोचल्याने पालकांमध्ये तीव्र चिंता निर्माण होते. मुले शाळेतून घरी न पोहोचल्याने पालकांनी लोणी बसस्थानक गाठले होते. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने संपर्क साधणेही कठीण झाले. त्यामुळे पालकांची कसरत झाली.