अलवरजवळ पिकअपला आग; तीन जिवंत जळाले

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
अलवर,
Delhi-Mumbai Expressway accident राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेवर मंगळवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला. एक्सप्रेसवेवरील चॅनेल क्रमांक १३१.५ जवळ दिल्लीहून जयपूरकडे जाणारा एक पिकअप ट्रक दुसऱ्या वाहनावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहनाला तात्काळ आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झाले. या दुर्घटनेत पिकअपमधील तीन जण जिवंत जळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला.
 
 
Delhi–Mumbai Expressway
 
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख बहादूरगड (हरियाणा) येथील मोहित, तसेच मध्य प्रदेशातील सागर येथील रहिवासी दीपेंद्र आणि पदम अशी झाली आहे. गंभीर जखमी झालेला चालक झज्जर (हरियाणा) येथील रहिवासी असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जयपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
 
 
घटनेची माहिती मिळताच रैनी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. त्यानंतर मृतदेह रैनी येथील रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले. पिकअप वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून ते हरियाणातील झज्जर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भीषण अपघाताचा नेमका कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.