नागपूर,
Dr. Nandkishor Karde रातुम नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख तथा प्राध्यापक प्रा. डॉ. नंदकिशोर एन. करडे यांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसतर्फे सन २०२५ साठी ‘केमिकल सायन्सेस’ या विभागात फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. रसायनशास्त्र क्षेत्रातील संशोधन, अध्यापन आणि शैक्षणिक प्रशासनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधकांची दरवर्षी महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसतर्फे फेलो म्हणून निवड केली जाते.
ही निवड अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानली जाते. सुमारे २७ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत प्रा. डॉ. करडे यांनी रसायनशास्त्र विषयातील संशोधनाला भरीव दिशा दिली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये त्यांचे ५२ संशोधन लेख प्रकाशित झाले असून, अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या एका विश्वकोशात त्यांचे प्रकरण समाविष्ट झाले आहे. त्यांच्या नावावर तीन पेटंट्स असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. डीएसटी आणि यूजीसी पुरस्कृत सात संशोधन प्रकल्पांचे प्रमुख संशोधक म्हणून त्यांनी सुमारे २.४ कोटी रुपयांचा संशोधन निधी मिळवला आहे. उत्कृष्ट अध्यापनासाठी ५ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. तसेच, रसायनशास्त्र विषयातील १६ एनपीटीईएल ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी ‘एनपीटीईएल सुपरस्टार’ ही उपाधी मिळवली आहे. यामध्ये ११ टॉपर, ६ सुवर्ण, ९ रौप्य पदके आणि १ एलिट श्रेणीचा समावेश आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांचे समीक्षक म्हणूनही ते कार्यरत आहेत. सध्या ते विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक म्हणून कार्य पाहत असून, यापूर्वी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर आणि कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी प्रा. डॉ. करडे यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.