तभा वृत्तसेवा
मारेगाव,
farmers-news : मारेगाव महसूल विभागामार्फत तलाठ्यांना पुरविण्यात आलेले लॅपटॉप व प्रिंटर मागील कित्येक वर्षांपासून सतत नादुरुस्त असल्याने त्रस्त झालेल्या तलाठ्यांनी तहसीलदार कार्यालयात शासनदरबारी जमा केले आहेत. वारंवार बिघाड, दुरुस्ती करूनही न सुधारणारी उपकरणे आणि नवीन साधने मिळण्यास होत असलेली दिरंगाई यामुळे तलाठी कार्यालयांचे कामकाज अक्षरशः ठप्प झालेले आहे. याचा फटका मात्र शेतकèयांना बसला आहे.
तलाठ्यांकडून अनेकवेळा लेखी व तोंडी स्वरूपात संगणक व प्रिंटर बदलून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने कर्मचाèयांसमोर काम करायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, प्रशासकीय बाब म्हणून नादुरुस्त साहित्य तहसीलदारांकडे जमा करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे तलाठी संघटनेतर्फे सांगण्यात आले.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका मात्र शेतकèयांना बसत आहे. फेरफार नोंदी, सातबारा उतारे, सातबारा दुरुस्ती यांसारखी अत्यावश्यक कामे सध्या पूर्णतः बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जमीन व्यवहार, कर्ज प्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकरी हित लक्षात घेता तलाठ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने तातडीने नवीन व दर्जेदार संगणक, प्रिंटर उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा ग्रामीण महसूल यंत्रणा अधिकच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.