तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
independent-candidate-campaigns : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर यवतमाळच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका अपक्ष उमेदवाराला पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषद यवतमाळ सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले भारत दिगांबर ब्राह्मणकर असे त्या अपक्ष उमदवाराचे नाव आहे.
ब्राह्मणकर यांनी याबाबत अवधूतवाडी पोलिस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल करत, निवडणूक संपेपर्यंत स्वतःसह कुटुंबीय व समर्थकांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. उमेदवारी दाखल केल्यापासूनच राजकीय दबाव वाढल्याचा दावा करत त्यांनी थेट राजकीय कंटक कार्यरत असल्याचा इशारा दिला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतरही ब्राह्मणकर यांच्या सहकाèयांना तसेच प्रभागातील महिला समर्थकांना शिवीगाळ, धमक्या व बदनामीचे प्रयत्न सुरू असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच कुटुंबियांविरोधात फसवणूक व खोट्या आरोपांचे जाळे रचले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यापुढे काही गंभीर घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. असा स्पष्ट इशारा देत ब्राह्मणकर यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना प्रत देत तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. वार्ड 17 रणांगणात उतरून एका बलाढ्य पक्षाशी लढा लढल्या जात आहे. या प्रकरणामुळे प्रभाग क्रमांक 17 मधील निवडणूक अत्यंत अटीतटीची होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपक्ष उमेदवाराला पोलिस संरक्षणाची मागणी करावी लागणे हे केवळ एका प्रभागापुरते मर्यादित न राहता, यवतमाळच्या लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता प्रशासनाकडून या गंभीर आरोपांची दखल घेत पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.