केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची प्रतापराव जाधव व आ. श्वेता महाले यांनी घेतली भेट

अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पावर निधी उपलब्ध करून देण्याची केली आग्रही मागणी

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
Khamgaon Jalna railway project, इंग्रज काळापासुन बहुप्रतिक्षीत असलेल्या आणि राज्य सरकारने ५० % खर्चाला मंजुरात दिलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामावर या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे यावेळी त्यांच्यासोबत आ. श्वेता महाले उपस्थित होत्या.
 

Khamgaon Jalna railway project, 
खामगांव-जालना हा रेल्वे मार्ग व्हावा अशी अपेक्षा बुलढाणा लोकसभा मतदार संघातील नागरीकांची आहे. या संदर्भात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारने १५ मार्च २०२४ रोजी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लागणार्‍या ५० % खर्चाच्या मान्यतेला मंजुरात प्रदान करुन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे पाठविला आहे. या अर्थसंकल्पामध्ये या रेल्वेमार्गावर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज १६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्षात भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेता महाले पाटील, विद्याधर महाले, डॉ. आशुतोष गुप्ता, गोपाल तुपकर, शेख अनिस शेख बुढन रेणुकादास मुळे, डॉ. किशोर वळसे उपस्थित होते.
हा रेल्वे मार्ग विदर्भ मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा आहे. शिवाय मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गांनाही जोडणारा ठरणार असुन सध्या प्रलचित असलेल्या मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गातील अंतर कमी करणारा ठरणार आहे.
बुलढाणा जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आहे. लोणार येथे खार्‍या पाण्याचे जगविख्यात सरोवर आहे. तर शेगांव येथे श्री.संत गजानन महाराजांचे समाधी स्थळ आहे. या एैतीहासीक,धार्मीक, आणि पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश विदेशातुन पर्यटक येत असतात. या रेल्वे मार्गामुळे व्यापार पर्यटन आणि कृषी उत्पादनासोबतच औद्योगीक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी या भेटी दरम्यान केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीही सकारत्मकता दर्शविली आहे.