तभा वृत्तसेवा
दारव्हा,
kranti-khedkar : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार शाळांमध्ये शारीरिक शिक्षा, मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक तसेच कोणत्याही प्रकारची धमकी अथवा भेदभाव यावर पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रचलित असलेले ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हे वाक्य आता इतिहासजमा होणार आहे, हे मात्र निश्चित.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13 डिसेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, कंत्राटी कर्मचारी अथवा शाळेशी संबंधित कोणालाही विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार राहणार नाही. मारहाण, कान ओढणे, उभे करणे, उपाशी ठेवणे, नाव ठेवणे, भीती घालणे किंवा मानसिक दबाव टाकणे अशा सर्व प्रकारांवर सक्त मनाई करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांवरील कोणतीही शारीरिक वा मानसिक शिक्षा हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये पोस्को कायदा व बालगुन्हेगारी कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय शिक्षण व्यवस्थेला भीतीऐवजी विश्वास, दडपशाहीऐवजी संवाद आणि शिक्षेपेक्षा प्रेरणा या दिशेने नेणारा आहे. मात्र, त्यासाठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण, समुपदेशकांची नेमणूक, पालकांचा सहभाग आणि शाळांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक झाले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण निश्चितच बळकट झाले असले, तरी शिस्त राखणे आणि अभ्यासाची गोडी निर्माण करणे शिक्षकांनी कसे करावे, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांच्या मतानुसार शिस्तीच्या नावाखाली शिक्षा चुकीची असली तरी पर्यायी शिस्तीची साधने, समुपदेशन, मानसशास्त्रीय प्रशिक्षण आणि शिक्षकांना आवश्यक अधिकार याबाबत शासनाने स्पष्ट मार्गदर्शन करणे गरजेचे होते.
शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे, विद्यार्थ्यांना होणाèया कोणत्याही प्रकारच्या शिक्षेचा मी कायमच विरोध करते. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि सुलाभक म्हणूनच आपले शैक्षणिक कार्य करायचे आहे. सोबतच विद्यार्थ्यांना सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे पालन करावे, असे सद्गुणदेखील त्यांच्यात रुजवणे महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा ताळमेळ शिक्षकांनी साधून आपले शैक्षणिक कामे करावे अशी अपेक्षा आहे.
- क्रांती खेडकर
गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती दारव्हा