मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, अजित पवारांकडे सर्व खाती

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Manikrao Kokate : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राच्या आधारे राज्यपाल देवव्रत यांनी खातेबदलाला मंजुरी दिल्याने कोकाटेंकडील सर्व खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील क्रीडा, युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांची जबाबदारी अजित पवारांकडे आली आहे.
 
 
 
KOKATE
 
सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ झाली होती. या निकालानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली होती. दरम्यान, आज सकाळीच कोकाटे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
 
कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. मात्र, त्या आधीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा सादर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मंत्रीपद काढून घेतल्यामुळे माणिकराव कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री बनले आहेत.
 
दरम्यान, सदनिका घोटाळ्याप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात असून कोकाटेंवर पुढील काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.