मुंबई,
Prithviraj Chavan refuses to apologize ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराबाबत केलेल्या विधानामुळे वादात सापडलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मत मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भाजपकडून तीव्र टीका झाल्यानंतरही आपण माफी मागणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सध्या ते या विषयावर सविस्तर बोलणार नाहीत, मात्र माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. “मी माफी का मागावी? मी काहीही चुकीचे बोललेले नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
मे महिन्यात पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्यात त्यांनी ऑपरेशनच्या पहिल्याच दिवशी भारताने पाकिस्तानशी संबंध तोडल्याचा दावा केला होता. तसेच, पहिल्या दिवशीच पाकिस्तानी लष्कराने भारतीय हवाई दलाची विमाने पाडल्याचेही त्यांनी म्हटले होते. या विधानांमुळे भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला आणि काँग्रेसवर देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. दरम्यान, काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानांचे समर्थनही करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार उज्ज्वल रमण सिंह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान किंवा भाजप नेत्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. काहीतरी गडबड असल्याचे संकेत असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, भाजप खासदार राजकुमार चहर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, अशा प्रकारची विधाने ही देशाच्या सशस्त्र दलांचा अपमान करणारी आहेत आणि यामुळे लष्कराचे मनोबल खच्ची होऊ शकते. ऑपरेशन सिंदूरचा परिणाम संपूर्ण जगाने पाहिला असून पाकिस्तानशी भारताने कशा प्रकारे सामना केला हे सर्वांना ठाऊक आहे, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस नेत्यांची निराशा आणि पराभवाची भावना त्यांना पाकिस्तानच्या भूमिकेच्या जवळ नेत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि भाजपच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे ऑपरेशन सिंदूरवरील हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.