रामदेवबाबा विद्यापीठात ‘डिजिटल ट्विन’वर एसीएम विंटर स्कूल

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
नागपूर,
ramdevbaba-university : नागपूर येथील रामदेवबाबा विद्यापीठ (आरबीयू) येथे “डिजिटल ट्विनसह भविष्याचे अभियांत्रिकीकरण” या विषयावर एसीएम विंटर स्कूलचे उद्घाटन उत्साहात झाले. दिनांक १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत आयोजित या दहा दिवसांच्या शैक्षणिक कार्यशाळेमुळे डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग-संलग्न शिक्षणाला चालना मिळणार आहे. या विंटर स्कूलचे आयोजन आरबीयूतर्फे करण्यात आले असून, व्हीएनआयटी नागपूर हे शैक्षणिक भागीदार, पर्सिस्टंट सिस्टिम्स हे उद्योग भागीदार, तर टीसीएस रिसर्च यांचे संशोधनात्मक सहकार्य लाभले आहे.
 
 
digital-twin
 
 
डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाची रचना, सिम्युलेशन, ऑप्टिमायझेशन तसेच औद्योगिक व सामाजिक उपयोग यांचा सखोल अभ्यास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटन समारंभात टीसीएस फेलो व प्रमुख पाहुणे विनय कुलकर्णी, आरबीयूचे संचालक डॉ. एम. बी. चांडक, संगणक विज्ञान विभागाच्या डीन डॉ. पद्मा अदाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रीती वोडिटेल, व्हीएनआयटीचे डॉ. उमेश देशपांडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळी विनय कुलकर्णी यांनी डिजिटल ट्विन तंत्रज्ञान भविष्यातील अभियांत्रिकी आणि स्मार्ट डिजिटल प्रणालींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात डिजिटल ट्विन म्हणजे भौतिक प्रणालींची रिअल-टाइम डेटावर आधारित आभासी प्रतिकृती असल्याचे स्पष्ट करण्यात आले, ज्यामुळे निरीक्षण, विश्लेषण आणि कार्यक्षमतेत सुधारणा शक्य होते. या विंटर स्कूलमध्ये टीसीएस रिसर्च, आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली आणि ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. देश-विदेशातून निवडलेले ५० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले असून, शिक्षणसंस्था-उद्योग-एसीएम यांचे सहकार्य डिजिटल भविष्यासाठी सक्षम प्रणाली घडविण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले.