शिवणगावात पुन्हा भूगर्भ हालचालीचे धक्केनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
तिवसा,
shivangaon underground tremors शिवणगाव येथे पुन्हा एकदा भूकंप सदृश्य भूगर्भ हालचालीचे सौम्य झटके जाणवल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी रात्री १२ वाजतानंतर हे धक्के जाणवले. यापूर्वी २४ व २५ नोव्हेंबर रोजी झटके जाणवले होते. सलग काही दिवसांत पुन्हा पुन्हा झटके येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

भूर्गभ  
 
 
पूर्वीच्या झटक्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत जिओलॉजिकल (भूवैज्ञानिक) पथक शिवणगाव येथे पाठवले होते. संबंधित पथकाने पाहणी करून प्राथमिक तपास केला. प्रशासकीय अधिकार्‍यांनीही गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र या तपासणीतून अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा निष्कर्ष समोर आलेले नाहीत. त्यामुळे भूगर्भ हालचालीचे नेमके कारण काय, पुढे आणखी धोका आहे का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. दरम्यान, प्रशासनाने शिवणगाव तसेच शिरजगाव मोझरी येथे भूकंपाच्या हालचालींची अचूक नोंद घेण्यासाठी भूकंप मापक यंत्र (सीस्मोग्राफ) बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन देऊनही अद्याप संबंधित यंत्र बसवण्यात आलेले नाही. परिणामी, पुन्हा झटके जाणवत असतानाही त्याची शास्त्रीय नोंद व अभ्यास होत नसल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. या पृष्ठभूमीवर शिवणगावचे सरपंच धर्मराज खडसे यांनी प्रशासनाकडे तातडीने भूकंप मापक यंत्र बसवण्याची जोरदार मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून, वारंवार होणार्‍या झटक्यांची शास्त्रीय तपासणी होणे अत्यावश्यक आहे. यंत्र बसविल्यास खरी परिस्थिती समजेल आणि योग्य उपाययोजना करता येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
 
ठिय्या आंदोलनाचा इशारा
सातत्याने शिरजगाव, शिवणगाव येथे हादरे बसत आहे. हे भूकंपाचे आहेत की अजून कशाचे हे सांगण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे. दरवेळी प्रशासन फक्त पाहणी करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसत आहे. त्यामुळे यावेळी तरी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी ठेवावी. त्याशिवाय, तातडीने भूकंप मापक यंत्र बसवण्यात यावे.shivangaon underground tremors अन्यथा तहसील कार्यालयात येत्या ८ दिवसांनंतर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशांत कांबळे यांनी दिला आहे.