वर्धा,
fines-for-school-buses : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्ठीने स्कूल बसेस व व्हॅनच्या चालक व मालकांनी मोटर वाहन कायद्याचे काटेकारपणे पालन करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येते. मात्र, नियमांना डावलून काही स्कूल बसेस व व्हॅन वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावर मंगळवार १६ रोजी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम राबवून ७ स्कूल बसेस व व्हॅनवर कारवाई करून १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक नितीन ऊके, सुबोध तायडे, पंकज नैताम, चंदन भगत, प्रफुल्ल मेश्राम यांनी विविध ठिकाणी स्कूल बस व व्हॅन अडवून पाहणी केली. तपासणी मोहिमेदरम्यान ७ स्कूल बस व व्हॅन चालकांनी टॅस भरला नसल्याचे पुढे आले. काही स्कूल बस व व्हॅन चालकांनी २ ते ३ वर्षांपासून तर काहींनी २ ते ३ महिन्यांचा टॅस भरला नसल्याचे पुढे आल्यावर १ लाख २४४ रुपयांचा दंड ठोठावला.
जिल्ह्यात ४२६ वैध स्कूल बस आणि व्हॅन
जिल्ह्यात एकूण ६३९ स्कूल बसेस व व्हॅन आहेत. त्यापैकी ४२६ स्कूल बसेस व व्हॅन संपूर्ण नियमांनुसार प्रवास योग्य आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा या हेतूने उपप्रादेशिक परिवहन विभागाने नियमांना बगल देणार्या स्कूल बस व व्हॅन चालक व मालकांविरुद्ध कारवाईसाठी मोर्चा उघडला आहे.