आम्ही बदला घेऊ; अहमदाबादमधील १० शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
अहमदाबाद,  
bomb-threats-to-schools-in-ahmedabad बुधवारी अहमदाबादमधील अनेक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. अचानक आलेल्या या धमकीमुळे शाळा प्रशासन, पालक आणि यंत्रणा सतर्क झाल्या. माहिती मिळताच पोलिस दलासह बॉम्बशोधक पथके घटनास्थळी दाखल झाली. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळा तात्काळ रिकाम्या करण्यात आल्या असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे.
 
bomb-threats-to-schools-in-ahmedabad
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धमकी देणारे ई-मेल खलिस्तान समर्थक घटकांकडून पाठवले असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या धमकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संसदीय मतदारसंघ तसेच साबरमती कारागृहात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचाही उल्लेख असल्याचे समजते. bomb-threats-to-schools-in-ahmedabad ई-मेलमध्ये ‘बदला घेऊ’ असा इशाराही देण्यात आला आहे. अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की, बुधवारी काही शाळांना एकच आशय असलेले धमकीचे ई-मेल मिळाले होते. या संदेशांची गंभीरता लक्षात घेता शाळांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. संयुक्त पोलिस आयुक्त शरद सिंगल यांनी सांगितले की, पोलिसांची पथके संबंधित शाळांमध्ये तैनात असून प्रत्येक बाबीची सखोल तपासणी केली जात आहे. ज्या शाळांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत, त्यामध्ये महाराजा अग्रसेन स्कूल, झायडस स्कूल फॉर एक्सलन्स, जेबर स्कूल यांच्यासह इतर शाळांचाही समावेश आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणामागे खलिस्तानशी संबंधित घटकांचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे, त्यामुळे शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, एका पालकाने शाळेकडून पाठवलेली सूचना शेअर केली असून त्यात ‘काही अपरिहार्य कारणांमुळे शाळेचा परिसर तात्काळ रिकामा करण्यात येत आहे. कृपया पालकांनी शक्य तितक्या लवकर येऊन आपल्या मुलांना घ्यावे,’ असे नमूद करण्यात आले होते. ‘एएनआय’शी बोलताना एका पालकाने सांगितले की, सूचना मिळताच ते अवघ्या दहा मिनिटांत शाळेत पोहोचले. शाळेतील सुरक्षाव्यवस्था समाधानकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. bomb-threats-to-schools-in-ahmedabad तसेच, ज्यांना व्हॉट्सऍपवर संदेश दिसला नव्हता, अशा पालकांना शिक्षकांनी थेट फोन करून माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. अहमदाबादपूर्वी देशातील इतर भागांमध्येही अशा स्वरूपाच्या धमक्या शाळांना मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून प्रत्येक धमकी गंभीरपणे घेऊन तपास केला जात आहे.