तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
swami-vivekananda-statue : भारतीय तरुणाईला दिशा देणारे, राष्ट्रनिर्मितीचे प्रेरणास्थान असलेले थोर संन्यासी स्वामी विवेकानंदांचे यवतमाळ शहरात 25 डिसेंबर रोजी ऐतिहासिक आगमन होत आहे. विदर्भातील सर्वात भव्य व आकर्षक अशी 18 फूट उंच पूर्णाकृती स्वामी विवेकानंदांची मूर्तीचे सोमवार, 12 जानेवारी रोजी सामका आयुर्वेदिक योग व वेलनेस सेंटर, गोधनी, येथे अनावरण करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचे विचार, राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास, युवक प्रबोधन व आध्यात्मिक जागृतीचा संदेश यवतमाळकरांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकामुळे यवतमाळ हे विदर्भातील एक महत्त्वाचे वैचारिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे.
या अनावरण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वामी विवेकानंदांच्या भव्य मूर्तीचे आगमन मंगळवार, 25 डिसेंबर रोजी शहरात होणार आहे. या दिवशी शहरात भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यवतमाळ शहर व परिसरातील सर्व नागरिक, युवक, विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वामी विवेकानंद प्रेमींनी मोठ्या संख्येने मूर्तीच्या स्वागतासाठी एकत्र यावे, असे आवाहन सामका आयुर्वेदिक योग व वेलनेस सेंटर व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.