ब्रुसेल्स,
A setback for Mehul Choksi मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये मोठा न्यायालयीन झटका मिळाला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी चोक्सीची भारत प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका बेल्जियम कोर्ट ऑफ कॅसेशनने फेटाळली आहे. यामुळे भारतात त्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला पुष्टी दिली असून, भारतात प्रत्यार्पणानंतर त्याला छळ किंवा अमानुष वागणूक दिली जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. अँटवर्प कोर्ट ऑफ अपीलचा चोक्सी न्याय नाकारण्याचा किंवा छळाचा धोका सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्याचा मत कायम ठेवण्यात आले आहे.
यासोबतच, कोर्टाने मेहुल चोक्सीवर १०४ युरोचा दंडही ठोठावला आहे, जो तात्काळ भरावा लागेल. भारतात आणल्यानंतर मेहुल चोक्सीला आर्थर रोड जेलच्या १२ क्रमांकाच्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार आहे. या बॅरेकममध्ये दोन बॅरेक असून, प्रत्येकामध्ये बाथरूम आणि मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. भारतीय एजन्सीने बेल्जियम पोलिसांना चोक्सीच्या हक्कांचे आणि आरोग्याचे संरक्षण करण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे. चोक्सीवर भारतात पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा आरोप आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, त्याने एकट्याने ६,४०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.
या प्रकरणात त्याचा पुतण्या नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील आरोपी आहेत. हे प्रकरण २०१८ मध्ये उघडकीस आले, ज्यात लेटर ऑफ अंडरटेकिंगद्वारे बँकांची फसवणूक करण्यात आली होती. घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सी भारत सोडून अँटिग्वा आणि बारबुडा गेला होता, जिथे त्याला २०१७ मध्ये नागरिकत्व मिळाले होते. २०२१ मध्ये तो अँटिग्वामधून गायब झाला आणि डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. २०२५ मध्ये वैद्यकीय उपचारांच्या बहाण्याने तो बेल्जियममध्ये आला आणि अँटवर्पमध्ये स्थायिक झाला.