वर्धा,
Abhinandan Done, मालवन जलतरण संघटनेतर्फे आयोजित १५वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवन येथे नुकतीच पार पडली. स्पर्धेत ८ राज्यातील १५०० हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला होता. वर्धेतून एकमेव ६ वर्षिय अभिनंदन डोणे याने ६ ते ८ वयोगटात ५०० मीटर सागरी जलतरणमधून दहावे स्थान पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.
मालवण येथे १३ व १४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत स्थानिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलाव येथील जलतरणपटू सहभागी झाले होते. यातील ६ वर्षिय अभिनंदन डोणे याने ५०० मीटर सागरी जलतरण अवघ्या १२ मिनिट २० सेकंदात पूर्ण करून १० वे स्थान प्राप्त केले. या यशाबद्दल त्याला रोख बक्षीस, मेडल, प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. अभिनंदन सोबत वर्धेचे स्वरुप सायंकार, मथुरा सायंकार, रुद्र अवघडे, अजय वाढेकर यांनीही सहभाग घेतला होता. सहभागी खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनंदनने आपल्या यशाचे श्रेय आईवडिल, प्रशिक्षक सांजनी वानखेडे, नरेश पाटनकर, आशिष डोणे, सुनील उईके यांना दिले.