वॉशिंग्टन,
America will provide weapons to Taiwan अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने तैवानबाबत मोठा आणि निर्णायक पाऊल उचलत चीनला स्पष्ट संदेश दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने तैवानला १० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीची अत्याधुनिक आणि घातक शस्त्रसामग्री देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे आशिया-प्रशांत क्षेत्रातील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे चीनमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी रात्री उशिरा, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील भाषणाच्या वेळी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या शस्त्र विक्री पॅकेजची अधिकृत घोषणा केली. परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले की, ही विक्री अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी महत्त्वाची आहे. तैवानची संरक्षणक्षमता बळकट करणे, लष्करी संतुलन राखणे आणि आशिया-प्रशांत भागात राजकीय स्थिरता कायम ठेवणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेच्या संघीय कायद्यानुसार, तैवानला स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती मदत करणे ही अमेरिकेची जबाबदारी आहे. मात्र, हाच मुद्दा चीनसाठी अत्यंत संवेदनशील असून, चीनने तैवानला आपला अविभाज्य भाग मानत, गरज पडल्यास बळाचा वापर करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनकडून तैवानजवळ वारंवार मोठ्या प्रमाणात लष्करी सराव केले जात आहेत.
या प्रचंड शस्त्र करारात ८२ हाय-मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम्स (HIMARS) आणि ४२० आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम्स (ATACMS) यांचा समावेश आहे. हीच क्षेपणास्त्र प्रणाली युक्रेनला रशियाविरोधातील संघर्षात देण्यात आली होती. या शस्त्रांची एकूण किंमत ४ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. याशिवाय, सुमारे ४ अब्ज डॉलर्स किमतीच्या ६० स्व-चालित हॉवित्झर तोफा आणि त्यासंबंधित उपकरणेही या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत. तैवानला देण्यात येणाऱ्या या संरक्षण पॅकेजमध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचे ड्रोन, १ अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचे लष्करी सॉफ्टवेअर, ७०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची जेव्हलिन आणि TOW क्षेपणास्त्रे, ९६ दशलक्ष डॉलर्सचे हेलिकॉप्टर सुटे भाग तसेच ९१ दशलक्ष डॉलर्सच्या हार्पून क्षेपणास्त्रांसाठी नूतनीकरण किटचा समावेश आहे.या निर्णयामुळे तैवानची लष्करी ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असून, चीन-अमेरिका संबंधांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.