शिरसगाव कसबा,
khomai-shirsgaon : परतवाडा ते बैतुल मार्गावर धावणार्या परतवाडा-बैतुल जाणार्या अनेक खाजगी बसेस सध्या स्थानिकांमध्ये चर्चेचा मुद्दा बनला आहे. या बसेसचे परमीट परतवाडा - बैतुल महामार्गापूरतेच मर्यादित असताना गेल्या अनेक दिवसांपासून ह्या बसेस खरपी गावापासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेल्या तपासणी नाक्याच्या आधीच्याच फाट्यावरून शिरसगाव कसबा - पाळा - खोमई रस्त्यावरून वळविल्याचे निदर्शनास येत आहे. बैतुलवरून वापस येताना ही बस पुन्हा नाका चुकविण्यासाठी तिप्पटमार्गे खोमईवरून शिरसगाव कसबा गाठत असल्याचे स्थानिकांकडून बोलल्या जात आहे.
//अरुंद रस्ता आणि तुटलेला पूल
खोमई-शिरसगाव हा रस्ता अत्यंत अरुंद असून यावरील पूल गेल्या अनेक वर्षांपासून क्षतीग्रस्त अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, खोमई गावातून बस तुटलेल्या पुलावरून, पर्वताच्या खचलेल्या चढ्या उतारातून कसरत करत काढली जात आहे. प्रवाश्यांना प्रचंड त्रास, भीतीचा सामना करावा लागत आहे.
//नियंत्रण आणि जबाबदारी कुणाची?
प्रादेशिक परिवहन विभागाची परमीट, मार्ग व नियमांचे पालन करून घेण्याची जबाबदारी आहे. उल्लंघन होत असल्यास कार्यवाही करणे आवश्यक आहे. बेकायदेशीर मार्गावरून होणारी वाहतूक व प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. रस्ते,पु लाचे नियंत्रण हे सा. बां. विभागाकडे आहे.
//अपघात झाल्यास?
जर तुटलेला पुलावरून किंवा अरुंद रस्त्यावरून जाताना एखादा गंभीर अपघात झाला तर याची जबाबदारी नेमकी कुणावर येणार? हा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे. प्रवाशांचे हाल,जीविताला धोका,नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना संबंधित यंत्रणा मौन बाळगून आहेत. प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून तुटलेल्या पुलाची दुरुस्ती होईपर्यंत त्या मार्गावरील जड वाहतूक बंद करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.