अबब... उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे 'बरे-वाईट करेल'!

सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
सोलापूर,
Anant Dhumma राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चार दशकांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी उमेदवारीसाठी थेट पक्ष नेतृत्वालाच इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
 

Anant Dhumma Solapur Municipal Corporation election 
सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून तब्बल १२०० हून अधिक अर्ज उमेदवारीसाठी दाखल झाले आहेत. यामध्ये अनेक जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनंत धुम्मा हे गेल्या ४० वर्षांपासून भाजपचे काम करत असून, यावेळी महापालिका निवडणुकीत त्यांना संधी मिळावी, यासाठी ते ठाम आहेत.
 
 
दरम्यान, अनंत Anant Dhumma  धुम्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याचे दिसून येते. “मी पक्ष स्थापन झाल्यापासून भाजपसाठी काम करत आहे. मला यावेळी १०० टक्के न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याशी चुकीचे वागणूक दिली गेली आणि माझ्या जीवाचे बरे-वाईट झाले, तर त्याला मी जबाबदार राहणार नाही,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले.धुम्मा यांनी सांगितले की, नगरसेवक नसतानाही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. इतकी वर्षे काम करूनही न्याय मिळत नसेल, तर स्वतःला काहीतरी करून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निष्ठावंत आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हे विधान भावनेच्या भरात केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
या संपूर्ण प्रकरणावर Anant Dhumma  भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा असे वाटणे स्वाभाविक असले तरी पक्षाला काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतात, असे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या आणि नव्या दोन्ही कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, तसेच कोणीही कायदा हातात घेऊन शहरातील वातावरण बिघडवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.उमेदवारी वाटपाच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी आणि वाढता असंतोष पाहता, सोलापूरमध्ये भाजपपुढे संघटनात्मक समतोल राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.